

हंजगी : मल्लिकार्जुन पाटील आता तुमचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वार्थासाठी कोणी तिकडे गेले म्हणून काँग्रेस पक्ष संपत नाही, लढायला सज्ज व्हा असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस मेळाव्यात केले.
अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील होते. प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन मध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार शिंदेसह खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील आदी नेते मंडळी उपस्थित होती. प्रारंभी नूतन तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी स्वागत केले. त्यांनी भाजपावर हल्ला चढवला. बस स्थानकाच्या पायवाटेच्या निमित्ताने जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खरपूस समाचार घेतला.
खासदार प्रणिती शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. भाजपा म्हणजे वाशिंग पावडरचा पक्ष झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अजित पवार सिद्धाराम म्हेत्रे यांची उदाहरणे आहेत. अजित पवारांचा उल्लेख निगरगट्ट असा करून त्या म्हणाल्या लाडक्या बहिणींचा वापर केला गेला. लाडकी बहीण योजनेला विरोध नाही मात्र, त्यामुळे संजय निराधार महिलांना पैसे मिळेनासे झाले आहे. श्रावणबाळ योजना बंद पडली आहे त्याचे काय करायचे ? असा सवाल त्यांनी केला.
खासदार विशाल पाटील म्हणाले, भाजपा आज फोडा-फोडीचे राजकारण करत आहे. माझ्याही घरात फूट पाडली. मात्र जे भाजपात गेले त्यांना पुढे निश्चित पश्चाताप होईल. सभेचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपाच्या जातीयवादी प्रवृत्ती विरुद्ध चौफेर हल्ला चढवला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष अशपाक बळोरगी यांनीही मनोगत व्यक्त केले.