

सोलापूर : सध्याच्या राजकारणात पक्ष आणि विचारधारा गौण ठरली असून, केवळ सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर हेच पक्षांचे मुख्य उद्दिष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने सत्तेसाठी आपली तत्त्वे पूर्णपणे सोडून दिली आहेत,” अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. सोलापूर दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
अंबरनाथमध्ये भाजप, काँग्रेस आणि एमआयएम यांनी एकत्र येत केलेल्या युतीचा दाखला देत आंबेडकर म्हणाले की, जे एमआयएम स्वतःला भाजपचे कट्टर विरोधक मानतात, ते आज केवळ सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले आहेत. देशावर संकटे असताना सत्ताधारी अनैतिक पद्धतीने वागत असून, अशा अनैतिक शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यात दबावाचे आणि धमक्यांचे राजकारण सुरू असून महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. वंचितच्या अनेक उमेदवारांना भीतीपोटी अर्ज भरू दिले नाहीत, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
“युद्ध टाळण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी भाजपच्या विरोधात मतदान करा. निवडणूक काळात पैसे वाटणाऱ्यांना धडा शिकवा; पैसे घ्या पण मत मात्र प्रामाणिक उमेदवारालाच द्या,” असे आवाहन आंबेडकरांनी मतदारांना केले. या परिषदेला सोमनाथ साळुंखे, अरुण जाधव, डॉ. नितीन ढेपे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2014 पासून वंचितला दूर ठेवणाऱ्या या पक्षांची अवस्था आता भाजपच्या तालावर नाचण्यासारखी झाली आहे. या पक्षांची अवस्था रिपाइंसारखी झाली असून, सत्तेसाठी ते लाचार झाले आहेत. अनैतिक पद्धतीने वागणाऱ्या या पक्षांना जनतेने सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.