Load shedding: गणेशोत्सव काळात विजेचा लपंडाव सुरू

आरतीच्या वेळेलाच लोडशेडिंग, नागरिकांतून नाराजी
Load shedding |
Load shedding: गणेशोत्सव काळात विजेचा लपंडाव सुरू File Photo
Published on
Updated on

सांगोला : तालुक्याच्या ग्रामीण भागात गौरी-गणपती सणाच्या अनुषंगाने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यामध्ये महावितरणकडून वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे श्री गणेशभक्तांच्या आनंदावर आता विरजण पडत आहे.

आरतीच्या वेळेलाच हमखास वीज गायब होते. यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात असून, ऐन सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरू झाला. यामुळे गणेशोत्सव मंडळासह गौरी सजावट करणार्‍या महिलांमधून महावितरण कंपनीच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व महावितरणचे प्रमुख अधिकारी यांनी लक्ष घालून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी केली जात आहे.

सांगोला शहर व तालुक्यात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाले आहे. सर्वत्र गणरायाची पूजाअर्चा होत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. त्याठिकाणी दैनंदिन पूजा-आरती महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दरम्यान कार्यक्रमाच्या वेळेलाच शिरभावी सबस्टेशनकडून लोड शेडिंगच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जातो. प्रामुख्याने सकाळच्या आरतीच्या वेळेला अनेकदा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याबाबत श्री गणेश भक्तांच्या तक्रारी आहेत.

यासह सर्वत्र गौरी-गणपतीनिमित्त घरामध्ये महिला मंडळाकडून मोठ्या प्रमाणात सजावटीचे कार्यक्रम केले जातात. यामध्ये विजेवर चालणार्‍या अनेक उपकरणे याचा वापर केला जातो. दरम्यान, कोणतीही कल्पना न देता सणासुदीच्या काळात वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज नियामक मंडळ ज्याप्रमाणे लाईट बिल उशिरा भरल्यास दंडात्मक कारवाई करते, त्याप्रमाणे विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालावे. यामधून नागरिकांना वेळेवर विद्युत पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागाला विद्युत पुरवठा करणार्‍या मेनलाईनवर लोड येत आहे. असे कारण पुढे करत, महावितरणकडून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणचा कारभार रामभरोसे झाला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत.

तसेच याबाबत संबंधित महावितरणच्या कार्यालयास फोन करून नागरिक दररोज तक्रारी करत आहेत. यावर लोड शेडिंग हे एकच उत्तर मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, किमान सणासुदीच्या काळामध्ये तरी वीज सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news