

मोहोळ : मोहोळ शहरासह तालुक्यातील तापमानात गेल्याकाही दिवसांपासून अचानक वाढ झाल्याने उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाने 40 अंशांपर्यंत झेप घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतातील सुगीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना,शेतमजूरांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. उष्माघाताच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, डोक्यावर आच्छादन ठेवणे आणि दुपारी बाहेर जाणे टाळणे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान,थंड पेय, फळे आणि पाण्याची मागणी वाढली असून बाजारात पंखे, कुलर व एअरकुलरच्या खरेदीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
उष्णतेची ही लाट चार आठवड्यांपेक्षा जास्त कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.