

सोलापूर : जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा अधिक जणांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकूल मंजूर झाले आहेत. मात्र, जागेअभावी हजारो लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम बंद आहे. अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसहाय्य योजनेतून एक लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. मात्र, घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी घरकुलांचा दुसरा हप्ता न घेतलेल्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा हप्ता घेऊ नये, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने गरीबांना घर मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित केली आहे; मात्र अनेक लाभार्थ्यांकडे जागाच उपलब्ध नसल्याने अशा लाभार्थ्यांची अडचण झाली आहे. यावर एक लाख रुपयांचे अनुदान शासन देणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी पंचायत समिती अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंत त्या लाभार्थ्यांना जागेसाठी एक लाख रुपये मिळणार आहे. मात्र, बर्याच लाभार्थ्यांना या योजनेची माहिती नसल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडे फक्त सात अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील सहा लाभार्थ्यांना जागा घेण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे घरकूल मंजूर झालेल्या भूमिहिन लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे तत्काळ अर्ज करण्याची गरज आहे.
हजारो बेघरांना मिळणार घर
प्रधानमंत्री आवास योजनेतील हजारो घरकूल लाभार्थी घरकुलांसाठी पात्र असूनही केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत आहेत. अशा लाभार्थ्यांनी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून लाभ घेतल्यास हजारो बेघरांना घर मिळणार आहे.
जागेसाठी असे मिळते अनुदान
घरकूल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांनी प्रारंभी पाचशे स्वेअर फूट जागा खरेदी करायची. त्यानंतर पंडित दिनदयाल उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवावे. पंचायत समितीकडून त्या प्रस्तावाची पडताळणी करून जागेची किंमत रेडीरेकनर किंवा खरेदीसाठीनुसार जी कमी किंमत असेल ती ठरविण्यात येते. त्या किंमतीनुसार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार ते एक लाखांपर्यंत अनुदान जमा करण्यात येते.
या घरकुलांना मिळणार लाभ
केंद्र, राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनेतून ग्रामीण भागात घरकूल मंजूर घर बांधकाम करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
योजनेला अल्प प्रतिसाद
जिल्ह्यात घरकूल बांधकाम करण्यासाठी दोन हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना जागा नाहीत. त्या लाभार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील बार्शी येथून पाच, माढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येक एक असे एकूण सातच प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल अर्थसहाय्य योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.