

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अनेकांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांकडे बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्याने जिल्हा प्रशासनाने लँड बँकेतून संबंधित लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना गतिमानतेने राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 4 हजार लाभार्थ्यांकडे घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात शर्तभंग झालेले, करार संपलेले, गावठाण, गायरान या जागा महसूल विभाग ग्रामपंचायतीला हस्तांतरित करणार आहे. त्यासाठी संबंधित तहसीलदारांना आदेश देण्यात आल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले. ही जागा प्रति 1 रुपये चौरस मीटर दराने ग्रामपंचायतीकडे हस्तातंरित झाल्यानंतर तेवढ्याच दराने ती जागा सबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा मार्ग मोकळा होणार आहे.
घरकुलासाठी 500 स्केअर फुटाची जागा दिली जाणार आहे. सध्या ज्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत शासनाच्या नियमानुसार रितसर नोंदणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. तसेच घरकूलसाठी जागा खरेदी करणार्या लाभार्थ्यांस पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतून 50 हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. ती जागा खासगी व्यक्तीकडून खरेदी केल्यास अनुदान देण्यात येणार असल्याचेही आशीर्वाद यांनी सांगितले.