

बार्शी : कर्ज थकबाकीपोटी बँकेच्या ताब्यात असलेल्या एका मंगल कार्यालयातील लोखंडी अँगल व पत्रे असा 55 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी कटरच्या साह्याने चोरून नेला. ही घटना बार्शी-कुर्डूवाडी बाह्यवळण रस्त्यावरील जामगाव शिवारात घडली.
जनता सहकारी बँक धाराशिवचे बार्शी शाखा अधिकारी अनंत विलासराव शिंदे (रा. घोडे गली बार्शी) यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राकेश किलचे (रा. वाणी प्लॉट बार्शी) याने बँकेकडून 2021 मध्ये हॉटेल व्यावसायासाठी सहा कोटी रुपये कर्ज घेतले होते. कर्ज घेतेवेळी त्याने जामगाव शिवारातील शेती गट नं 62/1 सह त्या मध्ये असणारे हॉटेल, मंगलकार्यालय आदी तारण दिले होते. कर्ज घेतल्यानंतर त्यांनी ते भरलेले नाही. त्यामुळे किलचे यांनी तारण ठेवलेल्या सर्व मालमत्तेचा ताबा बँकेने घेतला. घेतलेल्या कर्जाची रक्कम भरणे होत नसल्याने सदरच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय झाला. बँकेला अपेक्षित बोली रक्कम आली नसल्यामुळे मालमत्तेची विक्री झाली नाही.
इच्छुक व्यक्ती मालमत्ता घेण्यासाठी आल्याने त्यांना घेऊन बँकेचे अधिकारी संबंधित ठिकाणी गेले असता मंगल कार्यालयाला लागून असणारे पत्राशेड हे अँगलसहित कटरणे कापून नेल्याचे दिसून आले.