

सुमित वाघमोडे
सोलापूर : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गातून कोट्यवधी रुपये कमाविण्यासाठी राजकीय नेते, उद्योगपती सोबतच लिंगपिसाट अशोक खरातसारखे भोंदूबाबादेखील पुढे आले असल्याचे उघड झाले आहे. हा महामार्ग कुठून जाणार होता, याची माहिती अगोदर मिळवून त्या मार्गावरील जमिनी स्वस्त दराच आधीच खरेदी करून ठेवल्याचे उघड झाले आहे. परंतु, महामार्गात बदल झाल्याने अनेकांचे कोट्यवधी रुपये लाटण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.
सोलापूर जिल्ह्याचा विचार करता बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर व सांगोला तालुक्यातून जाणारा शक्तीपिठाचा जुना मार्ग आता बदलला आहे. बार्शीतून थेट माढा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यातून आता नवा मार्ग जाणार आहे. शक्तीपिठाचा जुना मार्ग उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथून जात असल्याचे माहीत झाल्याने भोंदू अशोक खरात, माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील, परिवहनचे माजी अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यासह उद्योगपती ओसवाल यांनी येथे जमिनी खरेदी केल्या. परंतु, तेथून जाणारा मार्ग बदलण्यात आल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
अशोक खरात याचे नाव आल्याने हे प्रकरण बाहेर आले. त्यामध्ये अनेकांची नावे निष्पन्न झाली. या नावांव्यतिरीक्त शक्तीपिठाच्या जुन्या मार्गावर अनेक राजकीय नेत्यांनी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी जमिनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळेच काही अधिकार्यांनी शक्तिपिठाचा मार्ग बदलण्यास विरोध केला असल्याचा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. सोलापुरात अनेक अधिकार्यांनी दुसर्यांच्या नावे या जमिनी खरेदी केल्या आहेत. शक्तीपिठाचा मार्ग बदलण्यास विरोध झाल्यानंतर राज्य शासनाने याची दखल घेत कोणकोणत्या अधिकार्यांनी कुणाच्या नावावर जमिनी घेतल्या याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या मार्गाने दिला धक्का
बार्शी : गौडगाव, रुई, निंबळक, मुंगशी, मालेगाव, रातंजन, लाडोळे, सर्जापूर, सासुरे, वैराग,
ढोराळे, तडवळे, यावली.
माढा : धानोरे, मानेगाव, यावली, उंदरगाव, विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक, रोपळे खुर्द, बावी, सोलंकरवाडी, अरण, मोडनिंब, तुळशी.
पंढरपूर : करकंब, नेमतवाडी, पेहे, नांदोरे, आव्हे.
माळशिरस : नेवरे, जांबूड, विठ्ठलवाडी, माळखांबी, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, मगरवाडी, गारवाड.
जुन्या मार्गावर जमीन खरेदी
बार्शी : गौडगाव, रातंजन, मालेगाव, अंबाबाईचीवाडी, आंबेगाव, जवळगाव, हत्तीज, चिंचखोप, शेळगाव.
उत्तर सोलापूर : कौठाळी, कळमण, पडसाळी
मोहोळ : मसले चौधरी, खुनेश्वर, भोयरे, घाटणे, हिगणी निपाणी, मोहोळ शहर, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे, टाकळी सिकंदर
पंढरपूर : फुलचिंचोळी, पुळूज, विठे, खरसोळी, पोहरगाव, आंबे, रांझणी, अनवली, कासेगाव, खर्डी, शेटफळ, तपकिरी,
सांगोला : मेथवडे, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी, चिंचोळी, बामणी, एखतपूर, कमलापूर, यलमार, मंगेवाडी, अजनाळे, चिणके, वझरे, बलवडी, नाझरे, चोपडी, बंडगरवाडी, सोमेवाडी.
नव्या मार्गावरही घेतल्या जमिनी
नव्याने झालेल्या मार्गावरही अनेकांनी जमिनी खरेदी केल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे. पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील शेतजमिनींना प्रचंड दर मिळत असल्याने तेथे या जमिनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून जादा पैसे मिळवण्याच्या हेतूने या जमिनीवर दोन ते तीन वर्षांपासून फळबाग असल्याची नोंदही करण्यात आली आहे.