

वाशिंबे : युरोपातून स्थलांतर करून महाराष्ट्रातील ज्वारी व द्राक्ष पिकावू प्रदेशांमध्ये विदेशी पाहुणे म्हणून हजारोंच्या संख्येने दरवर्षी येणारे भोरड्या अर्थात गुलाबी मैना या नावाने परिचित असलेले पक्षी उजनी धरणाच्या परिसरातील गावांच्या शिवारात येऊन दाखल झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावाच्या शिवारात हजारोंच्या संख्येने हे पक्षी सध्या मुक्कामाला असून दररोज संध्याकाळी व सकाळी हवाई कसरतींने पक्षी व निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहेत.
इंग्र रोझी पॅस्टर व रोझी स्टर्लिंग या नांवाने ओळखले जाणारे हे पक्षी युरोप खंडातील विविध राष्ट्रांमध्ये हिवाळ्यात जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करून घेण्यासाठी ज्वारी पिकविणाऱ्या प्रदेशात बहुसंख्येने हे पक्षी हिवाळ्यात येऊन दाखल होतात.
ज्वारी पिकांकडे दुर्लक्ष करत सध्या अनेक शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहेत. अशा परिस्थितीमध्येही पक्ष्यांनीही आपल्या खाद्य सवयीत बदल करीत असतात. सध्या ते द्राक्ष, पपई, अंजीर, डाळिंब, बोर यासारख्या फळ पिकांवर उपजीविका चालवतात.
पळसदेव परिसरातील शिंदे वस्ती, काळेवाडी, डाळे नं.1 आदी गावांच्या शिवारातील भूभागात शिरलेल्या उजनी धरणाच्या यशवंत जलाशयाच्या पाणलोट क्षेत्राच्या काठावरील झाडीझुडपाच्या दाटीवाटीने हे पक्षी हजारोंच्या संख्येने सध्या दररोज मुक्कामाला येतात.
पक्ष्यांचा दिनक्रम : स्थलांतर करून आल्यानंतर या पक्ष्यांच्या अनेक थवे मुक्कामासाठी एक मोठमोठे झाडं असलेले ठिकाण निश्चित करतात. या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे दिवसभर चरून ठरलेल्या ठिकाणी झाडांवर किंवा झुडपांवर आसनस्थ होतात. हवाई कसरत करतात. वेगावर नियंत्रण ठेवण्यात तरबेज असतात. झाडांवर विसावून दहा मिनिटे एकच कलकलाट करत आपसात संवाद साधतात. अंधार दाटून आला की एकदम चिडीचिप होऊन झोपी जातात. सूर्योदयाबरोबर हे पक्षी पुन्हा सुमारे दहा-बारा मिनिटे हवेत घोंगावत कसरत करून नंतर सर्व दिशेने चरण्यासाठी विखरून जातात.
मुर्मुरेशन : मुर्मुरेशन म्हणजे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच असते. भोरड्यांच्या या एकत्र येण्याच्या प्रकाराला इंग्रजित मुर्मुरेशन असे म्हणतात. सूर्यास्तापूर्वी सुमारे दहा ते पंधरा मिनिटे अगोदर भोरड्या लहान मोठ्या थव्याने मुक्कामाच्या ठिकाणी येतात. झाडांवर विसावण्यापूर्वी हे पक्षी हजारोंच्या संख्येने हवेतच उड्डाण करत एकत्र मिसळून जातात. सूर्योदयापूर्वी झाडांवर विसाव्या अगोदर व सूर्योदयानंतर उड्डाण घेतल्यानंतर आकाशातील या पक्ष्यांच्या कसरतीमुळे होतात.