

सोलापूर : वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही ती भरावीच लागते. अशा कायमस्वरुपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरु आहे. योजनेची मुदत 31 मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. तर सोलापूर मंडलातील 5598 ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेतला आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व बिगरशेती वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. 31 मार्च पर्यंत सुरू आहे. थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण 100 टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के अतिरिक्त सूट मिळत आहे. यासोबतच सुरवातीला मूळ थकबाकीच्या 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. तसेच लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने जोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.