

सोलापूर : गेल्या 24 वर्षांपासून मुख्यमंत्री, पंतप्रधानपदाच्या काळात नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी न घेता काम केले आहे. दहशतवादाचा बिमोड करताना पाकिस्तानला अद्दल घडवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. प्रखर देशभक्तीसह अभूतपूर्व विकास हीच मोदी सरकारच्या 11 वर्षांची उपलब्धी आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहर जिल्हा भाजपातर्फे आयोजित बुद्धिजीवी तसेच प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद कार्यक्रमांतर्गत भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी रविवारी ड्रीम पॅलेस सभागृहात सोलापुरातील बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधला.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष (पूर्व) शशिकांत चव्हाण, किशोर देशपांडे, आ. नरसिंग मेंगजी, रामचंद्र जन्नू, मनीष देशमुख, विशाल गायकवाड, महिला मोर्चा शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली उपस्थित होते. यावेळी आ. देवेंद्र कोठे, रंजिता चाकोते, साधना संगवे यांची प्रमुख उपस्थिती होती. लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे वितरित करण्याच्या योजनेतून गेल्या 11 वर्षांमध्ये 44 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 7 कोटी 71 लाख शेतकर्यांना 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज मिळाले. 2013- 14 या आर्थिक वर्षात 27 हजार 663 कोटी रुपयांची असलेली कृषी क्षेत्रासाठीची तरतूद मोदी शासन काळात 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 1 लाख 37 हजार 757 रुपये इतकी झाली.
दूध उत्पादनात 63.5 टक्क्यांची वाढ झाली. 1 लाखांहून अधिक अग्निवीर तयार झाले. 12 कोटी शौचालये बांधली. कोट्यावधी युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले. काँग्रेसकाळात 500 इतक्या कमी संख्येने असलेली स्टार्टअपची संख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन देऊन 1 लाख 25 हजार इतकी झाली. यातील 120 स्टार्टअप प्रत्येकी 8 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी असून यातील 80 नवउद्योजकांचे पालक मोलमजुरी, नोकरी करणारे आहेत हे याचे वैशिष्ट्य आहे असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी आवर्जून नमूद केले.
प्रामाणिकता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा गुण आहे. त्यांनी देशासाठी मोठा त्याग केला आहे. मला पद, प्रतिष्ठा, पैसा, कीर्ती नको तर देशीवासीयांचे हित हवे आहे, असे पंतप्रधान मोदी नेहमी सांगतात. महिलांना शहराध्यक्ष, वित्त मंत्री, संरक्षणमंत्री, शिक्षण मंत्री, राष्ट्रपती, विदेश मंत्री आदी महत्त्वाची पदे मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिळाली. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलाविषयक आदरभाव दिसून येतो, असेही भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले. भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी प्रास्ताविक तर भाजपाचे शहर सरचिटणीस प्रा. डॉ. नारायण बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.