

सोलापूर : पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी (दि. 15) जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा झाली. त्याला सोलापूरकांनी उत्स्फू र्त प्रतिसाद दिला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडेय उद्यानातून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला. पालकमंत्री गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, भाजप सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी या यात्रेत सहभागी झाले.
सैनिकों के सन्मान में हर भारतीय मैदान में, भारतमाता की जय, वंदे मातरम, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा घोषणा यावेळी दिल्या. सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक, तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते. मार्कंडेय उद्यानापासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा अशोक चौक, बाजारपेठ, साईबाबा चौक, 70 फूट रस्तामार्गे माधवनगर येथील पद्म मारुती देवस्थानसमोर विसर्जित झाली.
यात्रेत माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी आमदार राजेंद्र राऊत, श्रीकांचना यन्नम, विक्रम देशमुख, शहाजी पवार, अविनाश महागावकर, रंजीता चाकोते, पांडुरंग दिड्डी, किसन जाधव, जगदीश पाटील, चन्नवीर चिट्टे सहभागी झाले होते.
तिरंगा सन्मान यात्रेमध्ये भारतमातेची मूर्ती ठेवली होती. तसेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश देणारी प्रतिमाही लावली होती.