

सोलापूर : प्रवाशांच्या सुरक्षिततेसारखी महत्त्वाची जबाबदारी एसटीच्या चालकांच्या खांद्यावर असते. ती घेऊन वर्षानुवर्षे विनाअपघात सेवा बजावलेल्या चालकांमुळेच महामंडळाची मान उंचवल्याचे प्रतिपादन विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी केले.
महामंडळाच्या विभागीय कार्यालयात महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विनाअपघात सेवा बजावलेल्या वीस चालकांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना २५ हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह विभागीय व्यवस्थापक गोंजारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी यंत्र अभियंता (चालन) शीतल बिराजदार, कामगार अधिकारी प्रदीप सुतार, विभागीय वाहतूक अधिकारी परशुराम नखाते, सहाय्यक वाहतूक अधीक्षिका उमा गव्हाणे, विभागीय लेखा अधिकारी कुलकर्णी, विभागीय सांख्यिकी अधिकारी बालाजी कौलगे आणि भांडार अधिकारी श्रीमती मदने-पाटील आदींची उपस्थिती होती. तसेच महामंडळाचे विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी व चालक-वाहक उपस्थित होते.
गोंजारी म्हणाले, एसटीसह त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबादारी ही चालकांवरच असते. विनाअपघात सेवा दिलेल्या २० चालकांचा सपत्नीक सत्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. विनाअपघात सेवेच्या पाठीमागे अदृश्य शक्ती देणाऱ्या माऊलींचाही वाटा महत्त्वाचा आहे. म्हणूनच, प्रशासनाने सपत्नीक सत्कार करण्याचा निर्णय घेतला.