

बार्शी : दिवसाला शंभर रुपये पगारावर आमचे कसे भागणार, आमचा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडावा तसेच आरोग्यमंत्र्यांना एकवीस हजार रुपये वेतनवाढ करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली आ. दिलीप सोपल यांच्याकडे करण्यात आली.
आरोग्य खात्यात अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचार काम करीत असून त्यांना गेली कित्येक वर्ष राज्य शासनाने पगारवाढच केली नाही, राज्य सरकार महिन्याला 2900 रुपये तर केंद्र सरकार महिन्याला शंभर रुपये देते असे एकूण तीन हजार रुपये वेतनावर या महिला काम करतात. लाडकी बहिण योजनेचा लाभ नाही, पद अर्धवेळ असूनही पूर्ण वेळ काम करावे लागते, प्रवास भत्ता नाही, राष्ट्रीय सणांच्या व महापुरुषांच्या जयंतीच्या शासकीय सुट्ट्या नाहीत, रजा नाही, गणवेश नाही, आयडेंटी नाही, बोनस, ग्रॅज्युटी , निवृत्ती वेतन नाही, कोरोना काळातील विशेष भत्ता नाही अशा कठीण परिस्थितीत या अर्धवेळ ताई लोकांचे आरोग्य सांभाळत आहेत, ही गोष्ट अत्यंत वेदनादायी असल्याने त्यांची पगार वाढ व्हावी यासाठी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडावा, अशी मागणी आयटक संलग्न अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय संघटनेने आमदार सोपल यांच्याकडे केली.
यावेळी कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे, सचिव प्रविण मस्तुद, आशिया शेख , बाई चेंडगे, शितल करडे, तोळाबाई ओव्हाळ, महानंदा मोटे, मैना तोरणे , प्रमिला शिंदे , सुशीला धावारे, जयश्री नगरे, सुवर्णा नेंदाने, सरस्वती उंबरे, शांता जाधव, उषा कांबळे, जयश्री नवले आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सोपल यांनी उपस्थित महिलांसोबत चर्चा केली. पुढील अधिवेशनात हा प्रश्न विधीमंडळामध्ये उपस्थित करेन व आरोग्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करेन, असे आश्वासन दिले.