

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सोलापूर-पुणे महामार्गाच्या जवळ असलेल्या पापरी येथील टेकडीवर असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ‘स्वयंभू’ असलेले जमिनीतून आपोआप उगम पावले असलेले महादेवाचे लिंग पापरी पंचक्रोशीसह तालुक्यात प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. सध्या श्रावण महिना सुुरू असून येेथे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी होताना दिसत आहे.
दिवसेंदिवस या महादेव मंदिरातील भाविकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. या एकमेव ‘स्वयंभू’ महादेवाच्या लिंगाबद्दल गावातील वयोवृद्ध जाणकार शिवभक्तांकडून एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी संस्थान काळात पापरी व खंडाळी, ता. मोहोळ परिसरात खटवांग राजाचे संस्थान होते. तो या परिसरावर राज्य करीत होता. या राजास शिकारीचा छंद होता. दररोज राजा जंगलात शिकारीस जात असे. या राजास एकही अपत्य नव्हते. एकेदिवशी राजा नेहमीप्रमाणे शिकारीसाठी गेला असता खूप वेळ फिरूनही शिकार मिळाली नसल्याने तो थकला होता. थकल्यामुळे त्याला विश्रांती घ्यावी असे वाटले. जंगलात त्याला एक कडुलिंबाचे झाड दिसले, त्या झाडाखाली असलेल्या खडकावर तो बसला. त्याला तेथेच झोप लागली. झोपेत त्याला महादेवाचा द़ृष्टांत झाला ‘राजा तू झोपला आहेस तिथे माझे अस्तित्व आहे, माझ्या डोक्यावर सावली कर तुझा वंश वाढेल, तुला अपत्य होईल’. राजा स्वप्नातून जागा झाला आणि उठल्यावर त्या खडकाकडे त्याने नीट पाहिले असता तेथे ‘स्वयंभू’ महादेवाचे लिंग दिसले, जे सध्याही अस्तित्वात आहे.
राजाने तत्काळ तेथे 6 ते 7 खणाची इमलारूपी खोली बांधली व त्या ‘स्वयंभू’ महादेव लिंगावर सावली केली. नंतर काही दिवसांनी राजाच्या पत्नीस दिवस गेले व अपत्य झाले. आता मंदिराचे बांधकाम भव्य असून महाशिवरात्रीनिमित्त येथे हरिनाम व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सप्ताहाचे ग्रामस्थांतर्फे 18 वर्षांपासून आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीला मंदिरावर मोठी यात्रा भरते. मोहोळ तालुक्यातील विविध गावांतील तसेच पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कर्नाटक परिसरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. पापरी गावातील काही नागरिक नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले असले तरी ते यात्रेदिवशी मंदिरावर दर्शन घेण्यासाठी येतातच. महाशिवरात्रीला आलेल्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी सुमारे
7 लाख रुपये लोकवर्गणी ग्रामस्थांनी गोळा करून भव्य असे पत्राशेड उभारले आहे. माजी आमदार रमेश कदम यांनीही आपल्या विकासनिधीतून मंदिरात हायमास्ट दिवा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात पापरी गावातील ‘स्वयंभू’ महादेव लिंगासारखे इतर दुसर्या कोणत्या ठिकाणी लिंग नसल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते.
मंदिरास कसे जाल
पापरी गावापासून हे महादेव मंदिर 3 किमी अंतरावर आहे तर सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी फाट्यावरुन 2 किमी अंतरावर आहे. मंदिरापर्यंत पक्का रस्ता आहे.