

मोहोळ : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून डुकरांच्या मृत्यूने मोहोळ शहरात थैमान घातले असून, आरोग्यासह दुर्गंधीने मोहोळकर त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत साधारण 2 हजार डुकरांचा मृत्यू झाल्याचे घंटागाडी कर्मचार्यांनी सांगितले. शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी व मृत डुकरांची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडी कर्मचार्यांचे योगदान मोठे आहे.
मोहोळ शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेकडून आठ घंटागाड्यांद्वारे शहराच्या विविध भागातील कचरा गोळा करण्याचे काम करण्यात येते. शहर स्वच्छ ठेवण्यात डुक्कर या प्राण्यांचेही योगदान आहे. मोहोळ शहरांत आठ घंटा गाड्यांना मार्फत ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो. मात्र तरीही काही लोक उरलेले शिळे अन्न, भाजीपाल्यांची देठं, सडलेली फळे कचर्यात टाकून देतात. हे पदार्थ सडल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते. हे टाकाऊ पदार्थ खाण्याचे काम डुक्कर हा प्राणी करतो.
त्यामुळे शहर स्वच्छतेच्या कामात जरी त्यांचं महत्त्व असले, तरी गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून मोहोळ शहरातील समर्थ नगर, न्यू समर्थ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, क्रांतीनगर, दत्तनगर, सुभाष नगर, विद्यानगर, मंदाकिनी सोसायटी, चंद्रलोक सोसायटी, नायकवाडी प्लॉट, तसेच मोहोळ शहराचा जुना भाग, नागनाथ गल्ली, बाजारपेठ, शिवाजी चौक, आदर्श चौक यासह शहराच्या विविध भागांमध्ये डुकरांची संख्या मोठी आहे.
गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून या प्राण्यांमध्ये अज्ञात साथीच्या आजाराची लागण झाल्यामुळे हे प्राणी मृत्यूला बळी पडत आहेत. शहरांमध्ये रिकाम्या प्लॉटमधील झाडाझुडपात हे प्राणी बसत असल्याने तिथेच त्यांचा मृत्यू होतो. ते झुडपात असल्यामुळे लोकांच्या निदर्शनास येत नाही. जेव्हा ते सडून फुगते तेव्हा त्यांची दुर्गंधी पसरते तेव्हा लोकांच्या लक्षात येते. अशावेळी घंटागाड्यांना फोन करून हे प्राणी उचलण्याचे काम केले जात आहे. अत्यंत जोखमीचे आणि आरोग्याला अपायकारक असणारं हे काम घंटागाडी कर्मचारी दिवसभर सतत करत आहेत.
घंटागाडी ठेकेदार मुकुंद गडेकर यांनी सांगितले, की गेल्या तीन महिन्यापासून मोहोळ शहरांमध्ये शहर स्वच्छता ठेवण्याचे काम करणार्या डुकरांमध्ये साथीचा रोग पसरल्यामुळे आत्तापर्यंत जवळपास दोन हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे.दररोज घंटागाड्यांमार्फत जवळपास 20 ते 25 मृत प्राणी उचलल्याचे काम आमचे कर्मचारी करत आहेत.