

पोखरापूर : मोहोळ -पंढरपुर -आळंदी या पालखी मार्गावरील मोहोळ बसस्थानक ते चंद्रमौळी गणेश मंदिर पर्यंतचे अनेक पथदिवे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना तसेच पंढरपूरच्या दिशेने जाणार्या भाविकांना अंधारात ये-जा करण्याची वेळ आली असून त्या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे.
मोहोळ -पंढरपूर -आळंदी पालखी मार्गावर मोहोळ बसस्थानकापासून चंद्रमौळी गणेश मंदिरापर्यंत महामार्ग प्रशासनाच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून त्या स्ट्रीट लाईट वरचे अनेक दिवे बंद आहेत. काही पोलवरचे तर दोन्ही बाजूचे दिवे बंद आहेत. यामुळे त्या परिसरात अंधार पडला आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने मराठवाड्यातून तसेच कर्नाटकातून सोलापूर मार्गे पंढरपूरच्या दिशेने जाणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. मोहोळ बस स्थानक हे सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे त्या ठिकाणी मोठी वाहनांची वर्दळ असते. बसस्थानकापासून चंद्रमौळी गणेश मंदिरापर्यंत अनेक वाहने थांबलेली असतात. अशा स्थितीत या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था असणे गरजेचे असताना पालखी मार्ग प्रशासनाकडून त्या ठिकाणी बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत आनस्था दाखवली जात आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून मोहोळ -पंढरपूर -पालखी मार्ग प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन पूर्वीप्रमाणे सर्व पथदिवे सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.