Pandharpur Wari : वाखरी तळापासून पंढरपूरपर्यंत मार्गावर लख्ख प्रकाश!

आषाढी यात्रेसाठी महावितरणकडून १७ अतिरिक्त रोहित्रे, ५०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात
Pandharpur Wari
वाखरी पालखी तळ ते पंढरपूर या पालखी मार्गावर १७ रोहित्रे जोडणी करण्यात आली आहेत.
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी आलेल्या दिंड्या, पालख्यांना तसेच भाविकांना सेवा देण्यासाठी महावितरण सज्ज झाले आहे. वाखरी पालखी तळ ते पंढरपूर या पालखी मार्गावर १७ रोहित्रे जोडणी करण्यात आली आहेत. तर ५०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २४ तास इमर्जन्सी सेंटरही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाखरी पालखी तळ ते पंढरपूर दरम्यानचा पालखी महामार्ग लख्ख प्रकाशात नाहून निघणार आहे.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ३३ केव्हीच्या ९ वीजवाहिन्या, १२ उपकेंद्रे आणि ३८ अकरा केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. १३७ ठिकाणी झुकलेले वीजखांब बदलण्यात आले आहेत. पावसाची शक्यता गृहित धरुन गर्दीच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी ५८२ उच्चदाब वीजखांब व स्टे-वायरला प्लॅस्टिकचे संरक्षक आवरण बसविण्यात आले आहे.

दरम्यान, सर्व १२ उपकेंद्रांतील पावर ट्रान्सफॉर्मर तसेच ४९० वितरण रोहित्रांचे ऑइल टॉप-अप करण्यात आले आहे. याशिवाय ९३ ठिकाणी गार्डिंग, ७३५ ठिकाणी स्पेसर्स, ८७ रोहित्रांना संरक्षक फेन्सिंग आणि १२९ वितरण रोहित्रांचे डिस्ट्रिब्युशन बॉक्स दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच ४६७ फीडर पिलर व मिनी पिलरवर प्लॅस्टिक शीट बसवून विजेच्या अपघाताचा धोका कमी करण्यात आला आहे.

तात्पुरते वीजजोडणीची १७ ठिकाणी

आषाढी यात्राकाळात दिंड्या, वारकरी व तात्पुरत्या व्यावसायिकांना आवश्यकतेनुसार तात्पुरते वीजजोडणी देण्यासाठी १७ अतिरिक्त वितरण ट्रान्सफॉर्मर उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. यासाठी १७४ अधिकारी व ३७३ कर्मचारी कार्यरत ठेवण्यात येत आहेत.

आषाढी यात्रेत आलेल्या भाविकांना अविरत व सुरक्षित वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील पालखीतळ आणि मार्गावर महावितरणचे कर्मचारी मदतीसाठी २४ तास उपलब्ध असणार आहेत.
मधुकर साळवे, कार्यकारी अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news