

सोलापूर : पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा राज्याच्या उच्चाधिकारी समितीसमोर 21 एप्रिल रोजी मांडण्यात आला होता. यात काही सुधारणा करण्यात येणार असून, पुंडलिक मंदिरासमोर उभारल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावरील कळसाचे दर्शन व्हावे, असे असे रेखांकन केले जाणार आहे. या आरखड्यात समितीने काही बदल सुचविले असून, त्यानुसार चार हजार 120 कोटींचा सुधारित कॉरिडॉर आराखडा राज्य शासनाच्या उच्चाधिकारी समिती समोर ठेवण्यात येईल. त्यानंतर तो अंतीम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी मंत्रालयात कॉरिडॉरबाबत उच्चाधिकारी समितीची बैठक झाली. यावेळी या प्रकल्पाबाबत सुमारे अडीच तास सादरीकरण जिल्हाधिकारी यांनी केले. पंढरपुरातील वारी परंपरा, मानाच्या पालख्या, पालखी विसावा स्थळे, पंढरपुरातील पालखी स्थळे, भीमा नदी परिसर, वारीतील नियोजन आदींबाबत यावेळी सविस्तर माहिती समितीसमोर सादर करण्यात आली.
पंढरपूर कॉरिडॉरचा ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ विभागात मंदिर परिसर, ‘ब’ विभागात मंदिर परिसर सोडून तर ‘क’ विभागात नदी परिसरातील प्रकल्पाचा आराखडा समाविष्ट करण्यात आला आहे. या विभागात सांडपाणी व स्वच्छतेच्या नियोजनाचा समावेश करण्यात आला आहे.
कॉरिडॉरची कामे 12 हजार स्केअर मीटर क्षेत्रावर केली जाणार आहे. कॉरीडॉर आराखड्यानुसार पंढरपुरात सध्या ज्या ठिकाणी दुकाने आहेत, त्याचठिकाणी ठेवून या दुकानांचे विकसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करणार आहे. वारी सोहळ्यात माऊलींच्या व संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या भेटीचा सोहळा वाखरीत होतो. येथील नाला अंडरग्राउंड करून तेथे वारकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्ाार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.