Vitthal - Rukmini | विठ्ठल चरणी अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका : अज्ञात भाविकाचे दान!

नाव न सांगण्याच्या अटीवर भाविकाकडून 56 लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका अर्पण
अज्ञात भाविकाने विठ्ठल चरणी दान केलेल्या सोन्याच्या पादूका
अज्ञात भाविकाने विठ्ठल चरणी दान केलेल्या सोन्याच्या पादूका
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत भाविकांकडून मंदिर समितीकडे रोख देणगीबरोबरच सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात दान प्राप्त होत आहे. आज गुरुवार दि. 16 जुलै रोजी एका दानशूर भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सोन्याच्या पादुका दान स्वरूपात विठ्ठल चरणी अर्पण केल्या आहेत. या पादुकांचे वजन 446 ग्रॅम आहे. त्यांची अंदाजे किंमत 56 लाख 59 हजार रुपये इतकी होत आहे.

अहिल्यानगर येथील भाविकाने या सोन्याच्या पादुका दान स्वरुपात दिल्या असल्याची माहिती कळाली आहे. दिवसेदिवस विठ्ठलाच्या खजिन्यात विविध सोन्याच्या दागिण्यांची वाढ होत आहे. या अगोदर विठ्ठलाला चांदीच्या पादुका घातल्या जात होत्या. आता यापूढे विविध प्रसंगी विठ्ठलाला सोन्याच्या पादूका घालण्यात येतील. तसेच भाविकांनी दान केलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कक्षामध्ये दान स्वरूपात प्राप्त होणाऱ्या मौल्यवान वस्तूंची तपासणी, शुद्धता पडताळणी, वजन, नोंदणी व सुरक्षित स्वीकार करण्यासाठी दोन सराफ तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सोने, चांदीच्या मौल्यवान वस्तू दान करावयाच्या आहेत, त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधून अधिकृत पावतीसह दान करावे, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले आहे.

यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम तसेच लेखाधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.

24 तास दर्शन सुरू

आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, दि.16 जुलै रोजी श्रींचा पलंग काढून मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार आहे. व्हीआयपी दर्शन व टोकन दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

एका दानशूर भाविकांने नाव न सांगण्याची इच्छा व्यक्त करत सुमारे अर्धा किलो सोनेच्या पादुका विठ्ठल चरणी दान केल्या आहेत. त्यामुळे विठ्ठलाचे चरण सुवर्णमय झाले आहेत. ज्या दिवशी आपण श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार घालतो, त्या दिवशी या पादुका घालण्यात येणार आहेत. तसेच आषाढी एकादशीला मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवळी देखील या सोन्याच्या पादुका विठ्ठलाला घातल्या जाणार आहेत.

-गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष मंदिर समिती पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news