

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणाची झीज झालेली आहे. लेपन प्रकिया (संवर्धन) करून ती झिज भरून काढण्यात येणार आहे. हे काम भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. २३ ते २५ सप्टेंबर असे तीन दिवस पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली.
पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह औसेकर महाराजांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची सभा पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच यांच्या आदेशानुसार मंदिर समितीने घेतलेल्या बैठकीत दि. २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संवर्धनासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी. तसेच, मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करता यावे. यासाठी दि. २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी (मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन) पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे.
यापूर्वी चार वेळा लेपन
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीवर पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्यामार्फत अत्यंत काळजीपूर्वक संवर्धनाचे कार्य केले जाणार आहे. यापूर्वी सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. शेवटच्या संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तींची नियमित देखभाल करण्याच्या अनुषंगाने मूर्तीला संरक्षक आवरण देण्यात येणार आहे.