

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी तासभर विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. त्यामुळे सोलापूरकर सुखावले असून, अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साचल्याने नागरिकांना कसरतीने वाहने चालवावी लागली. दरम्यान कुंभार वेस येथे पाण्याचा प्रवाह अधिक झाल्याने त्याचा फटका रिक्षाला बसला. मुलांनी ती रिक्षा ढकलून पाण्यातून बाहेर काढली.
यंदाच्या वर्षी रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र पूर्णपणे कोरड्या गेल्या आहेत. पेरण्या खोळंबल्या आहेत. नुसते आभाळ भरुन येत होते. परंतु अपेक्षित पाऊस पडत नव्हता. शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता आभाळ भरुन आले. पाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सहा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती.
नवी पेठ, बसस्थानक, कुंभार वेस, कुंभारी, मधला मारुती, होटगी रोडसह शहरातील अन्य भागातही सखल भागात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ न शकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांत पाणी शिरल्याने अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
शाळा आणि शासकीय कामकाज संपवून जाण्याच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेकांनी घराबाहेर पडताना रेनकोट, छत्र्या सोबत न ठेवल्याने पावसात भिजावे लागले. तर शाळकरी मुलांनी भिजण्याचा आनंद लुटला.