Vitthal Rukmini Temple : नवरात्रौत्सवात विठ्ठल-रुक्मिणी दागिन्यांनी सजणार

पुरातन अलंकार गाठवण्याच्या कामाला सुरुवात‎
Vitthal Rukmini Temple : नवरात्रौत्सवात विठ्ठल-रुक्मिणी दागिन्यांनी सजणार
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : नवरात्र महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणीला दागिण्यांनी सजविण्यात येणार आहे. शिवकालीन व पेशवेकालीन दागदागिने परिधान केले जाणार आहेत. दागिन्यांची सफाई करण्याचे व गाठविण्याचे काम रविवारपासून सुरू केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला संस्थानिक, राजे महाराजे, भाविकांनी सोने, चांदी, हिरे, माणके दान दिली आहेत. मंदिर समितीने हा खजिना जतन करून ठेवला आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खजिन्यातील दागिने गाठवण्याचे काम सुरू केले आहे. विठ्ठल- रुक्मिणीच्या खजिन्यात शिवकालीन, पेशवेकालीन अमूल्य दागिने आहेत. हे अलंकार जतन व सुरक्षततेच्या दृष्टीने गाठविण्यात येत आहेत. हे काम नवरात्र उत्सवापूर्वी करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी सदरचे अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

असे आहेत सोन्याचे दागिने

श्री विठ्ठलास सोन्याचे पैंजण, बाजीराव कंठी, मत्स्य, तोडे, सोवळे (धोतर), हिऱ्यांचा कंबरपट्टा, बाजुबंद, दंडपेट्या, मणिबंध, सोन्याची राखी, तुळशीची सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ, कौस्तुभमणी, हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी, बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा, नवरत्नांचा हार, सोन्याचे मुकुट, हिऱ्यांचा मुकुट, सोन्याची शिंदेशाही पगडी, चांदीची काठी, सोन्याची मकरकुंडले, नील व हिरे बसवलेला नाम- म्हणजे सोन्याचा गंध असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत. तसेच, श्री रुक्मिणी मातेस सोन्याचे वाळे, पैंजण, साडी, कंबरपट्टे, माजपट्टा, रत्नजडित पेट्या, हिरे, माणिक, पाटल्या, मोत्यांच्या व रत्नजडित जडावांच्या बांगड्या, गोठ, तोडे, हातसर आहेत.

गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार, पेट्यांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल सूर्य-चंद्र असे दागिने आहेत. हिऱ्यांचे खोड असलेला तन्मणी, तारामंडल असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news