Pandharpur Viththal Temple: विठ्ठल मंदिरात भाविकांना घेता येणार देवासमोर बसून दर्शन

विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच पूजेच्या वेळी मंत्री आमदार किंवा व्हीआयपी मंडळींऐवजी दर्शन रांगेतील सर्वसामान्य शेकडो भाविक देवासमोर बसून दर्शन घेताना दिसणार आहेत.

Pandharpur Viththal Temple

पंढरपूर: विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच पूजेच्या वेळी दर्शन रांगेतील सर्वसामान्य शेकडो भाविक देवासमोर बसून दर्शन घेताना दिसणार आहेत. मंदिर समितीच्या या ऐतिहासिक निर्णयाचे वारकऱ्यांकडून जोरदार स्वागत होत असून, "आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा विठू माऊली भेटला," अशा भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी आपला आनंद साजरा केला आहे.

विठ्ठल मंदिर समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद झाले आहे. पूर्वी सर्वसामान्य भाविकांना दर्शन रांगेतून थेट पदस्पर्श दर्शनासाठी तब्बल ८ ते १० तास ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र, नवीन नियमामुळे ही प्रतीक्षा कमी झाली असून भाविकांना जलद गतीने दर्शन मिळत आहे.

यातली सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, मंदिरातील रोजचे धार्मिक विधी आणि महानैवेद्याच्या वेळी, दर्शन रांगेत असलेल्या भाविकांनाच थेट देवाच्या समोर बसण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी ज्या व्हीआयपी जागेवर केवळ राजकारणी आणि बडे अधिकारी बसायचे, तिथे आता सामान्य वारकरी बसून विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठवताना दिसणार आहेत. या बदलामुळे भाविकांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण आहे.

"आम्ही भाग्यवान ठरलो!" भाविकांची प्रतिक्रिया

काही भाविकांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना आपला आनंद व्यक्त केला. एका भाविकाने सांगितले, "आम्ही अधिक मासाच्या निमित्ताने तिरुपती बालाजी, कोल्हापूर करत आज पंढरपुरात आलो. आज आमचे एवढे मोठे भाग्य की, आम्हाला थेट पांडुरंगाच्या समोर बसून पूजेचा आणि दर्शनाचा लाभ मिळाला."

मंदिर प्रशासनाने सांगितलं की, "जे सामान्य वारकरी दर्शनासाठी ६ ते ७ तास रांगेत उभे असतात, त्यांना नैवेद्य व पूजेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, हाच यामागचा उद्देश आहे. रांगेतून आलेल्या जवळपास १०० ते १५० भाविकांना दररोज या महापूजेचा आणि आरतीचा लाभ दिला जात आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news