

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरीत अधिक महिन्यानिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. असे असताना मंदिर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महिलांच्या सुलभ शौचालयात चोरून व्हिडिओ शूटिंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत महिला भाविकाने पोलिसात तक्रार दिली आहे.
नुकताच महाद्वार परिसरातील महिलांच्या सुलभ शौचालयात एका अज्ञात इसमाने महिलेचे चोरून शूटिंग करत असताना नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी शेजारील महिलांच्या सुलभ शौचालयात असाच संतापजनक प्रकार घडला आहे. एका महिला भाविकाला शौचालयामध्ये संशयास्पद हालचाल जाणवली.
त्यावेळी तिने वरती एका मुलाचे डोके पाहताच आरडाओरड सुरू केली. महिलेने त्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इसम घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर संबंधित महिलेने तीव्र संताप व्यक्त करत मंदिर परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. या घटनेतील पीडित महिलेने माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. यामुळे हा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दिल्याचेही सांगण्यात आले.