

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत 6 ते 7 तास ताटकळत उभे राहावे लागले होते. यामुळे भाविकांनी मंदिर समिती विरोधात नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली होती. तसेच वारकरी संप्रदायाने भाविकांच्या दर्शनात अडथळा आणणारी तुळशीपूजा बंद करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने रविवार, दि. 8 जूनपासून प्रक्षाळपुजेपर्यंत 80 तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्या भाविकांना सुविधा चांगल्या देण्यात याव्यात. यासाठी शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची स्थापना केली आहे. मात्र, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती भाविकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. व्हिआयपी दर्शन, तुळशीपूजेला दर्शन बंद, यामुळे भाविकांना दर्शन रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे जलद दर्शन मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील चार दिवसापुर्वी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 6 ते 7 तास दर्शन रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त घोषणाबाजी करण्यात आली. तुळशी पूजेमुळे भाविकांना दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागले. म्हणून मंदिर समितीने विठ्ठलाची तुळशीपूजा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज विठ्ठलाच्या 90 तुळशी पूजा होत होत्या. आता 80 पूजा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ 10 तुळशीपूजा सुरु राहणार आहेत. वारकर्यांची गर्दी वाढली, गरज भासली तर त्या 10 तुळशीपूजा देखील बंद करुन जास्तीत जास्त वारकर्यांना दर्शन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी पाईक संघटनेकडून रामकृष्ण महाराज वीर, विठ्ठल महाराज चौरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेवून अखेर मंदिर समितीने वारकरी संप्रदायाच्या दबावामुळे तुळशी पूजा रद्द केली आहे. यामुळे भाविकांना दर्शन रांगेत जास्तवेळ ताटकळत बसावे लागणार नाही. या निर्णयामूळे वारकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.