

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीकडून आज रविवारी (दि. 15) प्रथमच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी दिवशी सुमारे 1200 टोकन उपलब्ध होणार आहेत. भाविकांनी टोकन दर्शनाचे बुकिंग मंदिर समितीच्या संकेतस्थळावर करण्याचे आवाहन, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येतो. अगदी तशाच पद्धतीने पंढरपुरातही श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी इतिहासात पहिल्यांदाच टोकन दर्शन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी बेंगळुरूच्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून सेवाभावी तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे. दरवर्षी दर्शनासाठी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयीसाठी हे काम सुरू आहेे. त्यानुसार या टोकन प्रणालीद्वारे भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठरावीक वेळेत दर्शन हॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. ही प्रणाली विशेषत: गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांचा वेळ व श्रम वाचण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.
टोकन दर्शन प्रणालीसाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर बुकिंग करावे.
ऑनलाईन पद्धतीने तयार झालेले टोकन प्रिंट करून मिळेल.
त्या टोकनवर निश्चित करून दिलेल्या वेळी संबंधित भाविकाने श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाच्या मागीस बाजूस उपस्थित राहावे.
त्याठिकाणी टोकनची पडताळणी मंदिर समितीचे कर्मचारी करतील.
पडताळणीनंतर भाविकास दर्शन हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल.
त्यानंतर वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन भाविकांस श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन होईल.