

पंढरपूर : दिल्लीत झालेलया बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची सुरक्षा वाढविली आहे. दर दोन तासाला मंदिरात डॉग स्कॉडद्वारे तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह कर्मचाऱ्यांची हँड मेटल, मेटल डिटेक्टरद्वारे कसून तपासणी करण्यात येत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या भाविकांची, कर्मचाऱ्यांची डॉग स्कॉडद्वारे तपासणी करण्यात येत आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आलेला आहे. मंदिराचे उत्तर, पश्चिम, पूर्व आणि उत्तरद्वार अशा प्रत्येक प्रवेशद्वारावर बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूर येथील बीडीडीएस पथक मंदिर परिसरात जागोजागी तैनात करण्यात आले आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची, त्यांच्या बॅगेची देखील तपासणी पोलिस, सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या अगोदरच पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिलेला आहे. यामुळे गेल्या वीस वर्षांपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास 24 तास सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
दर दोन तासाला तपासणी
पंढरपूर शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणी बीडीडीएस पथकाद्वारे दर दोन तासाला तपासणी करण्यात येत आहे. याकरिता सोलापूर येथील टीम येथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे.