

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील आव्हे- तरडगाव परिसरात रस्त्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ये -जा करण्यासाठी अडचण येत असल्याने या ठिकाणी संतोष बागल यांच्या वतीने स्व:खर्चातून मुरमीकरण करण्यात आले आहे. ग्रामस्थांकडून याबाबतची मागणी सातत्याने होत होती.
पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील तरडगाव हा भाग माढा विधानसभा मतदारसंघात येतो. यंदाच्या पावसाळ्यात या गावातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी जगदंबा उद्योग समूहाचे संचालक संतोष बागल, मयुरी बागल यांच्याकडे रस्त्याबाबतचा विषय गावभेटीदरम्यान मांडल्यानंतर त्यांच्याकडून रविवारी सदर परिसरात स्वच्छता करण्यात आली.
तसेच मुरूम देखील टाकण्यात आला आहे. यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांची सोय होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. अलिकडेच पटवर्धन कुरोली येथील स्थानिकांच्या मागणीनुसार गावातील श्रीदत्त मंदिरासमोरील गाभाऱ्यातील कॉक्रिटीकरण जगदंबा उद्योग समुहाकडून करण्यात आले आहे.