

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना करकंब, विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगर गुरसाळे (ता. पंढरपूर) येथे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीकरीता कारखाने बंद पाडले आहेत. ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झाली असून योग्य दर द्या आणि कारखाने सुरु करा, अशी मागणी समितीने लावून धरली आहे.
पहिली उचल पाच हजार रुपये जाहीर करण्याच्या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला. ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने शेकडो कार्यकर्त्यांनी करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे येथील गाळप बंद पाडले आहे. गाळप बंद झाल्याने ऊसतोडणी आणि वाहतूक ठप्प झाली आहे. यंदाच्या हंगामातील उसाला पाच हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप सुरू केल्याने ऊस दर संघर्ष समितीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही ऊसदरासाठी आंदोलने करण्यात आली.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कारखाने सुरू करण्यात आल्याने संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. गुरुवारी दुपारपासून कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. व्यवस्थापनाने पाच हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा दर जाहीर करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि गाळप सुरू होऊ देणार नाही, असा इशारा ऊस दर संघर्ष समितीने दिला आहे. या आंदोलनामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनात दीपक भोसले, समाधान फाटे, सचिन पाटील, विक्रांत जगदाळे, निवास नागणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.