

पंढरपूर : दरवर्षी कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन, यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
शनिवारी, दि. १४ नोव्हेंबर रोजी शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. श्रींचा पलंग काढल्यानंतर काकड आरती, पोशाख, धूपारती, शेजारती आदी राजोपचार तात्पुरते बंद राहतील. तर नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे नित्योपचार नियमितपणे सुरू राहतील. २८ नोव्हेंबरपर्यंत ही २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
श्रींच्या नित्योपचारापूर्वी दर्शनरांग योग्य पद्धतीने नियंत्रित करून दर्शन बंद राहण्याचा कालावधी कमीतकमी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना शक्य तितक्या कमी वेळेत दर्शन मिळावे यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
कार्तिकी यात्रेदरम्यान विविध सुविधा उपलब्ध
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू झाले असून दर्शनरांगेत बॅरिकेटिंग व संरक्षक जाळी बसवून घुसखोरी रोखली आहे. व्हीआयपी दर्शन व टोकन दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद केली असून भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा देखील बंद करण्यात आल्या आहेत. रहदारी सुरळीत राहण्यासाठी तात्पुरत्या उड्डाणपुलाची उभारणी झाली. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी सुरू आहे. सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, लाईव्ह दर्शन व्यवस्था सुविधा असून दर्शनरांगेत भक्तिगीतांचे प्रसारण केले जात आहे.