

पंढरपूर : आर्थिक देवाण घेवाणीतून कीर्तन व हरिपाठ ऐकण्यासाठी जाणाऱ्या एका वृद्धाला गाठून, डोक्यात व गुप्तभागावर गंभीर वार करून खून करणाऱ्या दोन आरोपींच्या पंढरपूर तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तपासाचे कोणतेही धागेदोरे नसताना, आधुनिक तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही फुटेजच्या जाळ्याचा वापर करून पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी रमेश मोठे (वय ४५, रा. नरखेड) आणि ललिता सोळगे (वय ४३, रा. गणेशवाडी) या दोन आरोपींना अटक केली.
पंढरपूर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोपळे (ता. पंढरपूर) येथील भारत पांडुरंग माने यांचा ३१ मे च्या रात्री तुंगत येथे अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी, निर्मनुष्य ठिकाणी डोक्यात गंभीर दुखापत करून ठार मारले होते. घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने सुरुवातीला हा गुन्हा पूर्णपणे अज्ञात आरोपींविरुद्ध दाखल होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी तीन पथके तयार केली.
तपासादरम्यान पोलिसांना संशयित रमेश मोठे हा ३१ तारखेला महिला आरोपी ललिता सोळगेसोबत दिसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी रमेश मोठेची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, यापूर्वी त्याने नरखेड भागात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह शेतात पुरल्याचा गंभीर गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सापळा रचून रमेश मोठेला ताब्यात घेतले. सुरुवातीला रमेश याने 'मी ललिताला ओळखत नाहीं' अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.