Pandharpur Rain |
पंढरपूर : खर्डी येथे ऊस शेतातील पाणी रस्त्यावरुन वाहतानाची पाहणी करताना प्रणव परिचारक व शेतकरी.Pudhari Photo

Pandharpur Rain: पंढरपूर तालुक्यात सरसकट पंचनामे करण्यास नकार

बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहण्याची भीती; भावी सदस्यांची शेतकर्‍यांकडे पाठ
Published on

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे ऊसासह डाळींब, बोर, पेरु, द्राक्षे या फळबागांसह मका, बाजरी पिके पाण्यात बुडाली आहेत. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना मदत मिळावी म्हणून लोकप्रतिनिधी व प्रस्थापित नेते प्रत्यक्ष पाहणी करुन प्रयत्न करताना दिसत आहेत.

परंतु, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भावी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना मात्र शेतकर्‍यांचा विसर पडला आहे. प्रशासन सरसकट पंचनामे न करता ठराविक शेतकर्‍यांचे तोंडे बघून पंचनामे करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे खरे बाधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

पंढरपूर तालुक्यात गावोगावी मोठमोठे ओढे, नाले आहेत. हे सध्या तुडूंब भरुन वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे शेती पिके पाण्यात उभी आहेत. सततच्या पाण्यामुळे ऊस कोलमडून पडला आहे. उसाची मूळी कुजली असल्याने उत्पादनात घट होणार आहे. तर डाळींब बागेत पाणी साचून राहिल्याने फुल गळती झाली आहे. फळांवर तेल्या, मर, कुजवा, पिन होल, बोरर आदी रोग वाढल्याने जास्तीचे नुकसान झाले आहे. तर बोर, अ‍ॅप्पल बोर, चेकनेट बोरांची फळगळती झाली आहे. रोगाची लागण झाली आहे. तर द्राक्षबागेतही अशीच गत झाली आहे. फळबागांवर औषध फवारणी करता येत नाही. अनेकांचे कांदा पीक वाहून गेले आहे. तर मोडणीला आलेली मका जागेवर उगवू लागली आहे.

सततच्या पावसामुळे रस्त्यावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. विहिरी, बोअरवेल आपोआप वाहू लागले आहेत. विहीर व बोअरवेलच्या पाझरामुळे फळबागांना अधिकच फटका बसत आहे. शेतात पाणी उभा राहिल्याने शेतकर्‍यांना फेरफटका मारता येत नाही. अनेक शेतकर्‍यांच्या शेताच्या ताली, बांध फुटून माती वाहून गेली आहे.

विहिरीतील विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्या आहेत. शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी रस्त्यावर उभा राहून केली आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन करण्यात आलेली नाही. अशातच पंचनामा करणारे अधिकारी, कर्मचारी हे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार नदी, ओढे, नालेच्या ठिकाणचेच पंचनामे करत आहेत. मात्र, नुकसान झालेल्या इतर शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्यास नकार देत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

सततच्या पावसामुळे बोर, डाळींब बागेत पाणी उभारले आहे. बागेतील फळगळती होऊन मोठे नुकसान झाले आहे. ऊस शेती पाण्यात बुडाली आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे रितसर पंचनामे करावेत आणि कोलमडलेल्या शेतकर्‍यांना आधार द्यावा. अन्यथा नुकसान भरपाईसाठी आंदोलन करावे लागेल.
- अनिल बाबर, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news