

पंढरपूर : पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाळवणी, तिसंगी येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी एकाच दिवशी सलग चार ठिकाणी पो. नि. रेखा घनवट यांनी छापामारी केली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ४ जणांना रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईत पोलिसांनी देशी-विदेशी दारू आणि बीअर असा एकूण १४ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील तीसंगी येथे एका पत्राशेडच्या पाठीमागे छापा टाकून पप्पू पाटील याला बेकायदेशीरपणे देशी दारू विक्रीसाठी थांबला असता पकडला. भाळवणी येथे पोलिसांनी छापा टाकून नितीन पवार (क्य ३६, रा. भाळवणी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारू संत्रा अशा एकूण २८ बाटल्या (एकूण किंमत २,८१० रुपये) जप्त करण्यात आल्या.
भाळवणीमधील तृप्ती हॉटेल शेजारी पोलिसांनी तिसरा छापा टाकला. भिमराव शेरकर हा पांढऱ्या पिशवीत तब्बल १०,९५० रुपये किमतीचा विदेशी दारू व बीअरचा साठा घेऊन बसला होता. तर स्नेहा गार्डन येथे सायंकाळच्या सत्रात पोलिसांनी हुसेन आलिम पटेल (वय ३६, रा. भाळवणी) याला देशी दारू व इम्पेरिअल ब्लूच्या बाटल्यांसह कारवाई केली.