

पंढरपूर : पंढरपूर कॅरिडॉरमध्ये बाधित होणार्या मालमत्ताधारकांनी 1982 च्या मास्टर प्लॅनमध्ये बाधित झालेल्यांचा मोबदला अगोदर द्यावा, हवे तर रस्ते रुंदीकरण करा; परंतु आमची घरे दारे पाडून कॉरिडॉर राबवू नका, अशी मागणी केली.
उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर शासनाने पंढरपुरात कॉरिडॉर राबवण्याचा निर्णय घेतला. याकरिता जमीन भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने शुक्रवारपासून (दि.25) मालमत्ताधारकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली. यात बाधितांच्या समस्या व त्यांची मोबदल्याची अपेक्षा काय आहे, हे जाणून घेतले जात आहे.
कॉरिडॉरसाठी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बाधित मालमत्ताधारकांना पंढरपूर नगरपरिषदेने नोटिसा बजावल्या. त्यानुसार शुक्रवारी (दि. 25) बैठकीला सुरुवात झाली आहे. नगरपरिषद सभागृहामध्ये भूसंपादन उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मालमत्ताधारकांना चांगला मोबदला देण्यात येणार आहे. भाडेकरूंना तुम्ही काही देण्याची गरज नाही. शासन भाडेकरूंना मोबदला देणार आहे.