

पंढरपूर : श्री. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळयासाठी मंदिर समितीमार्फत श्री. विठ्ठलाच्या पादुका 2014 पासून ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांचे पायी दिंडी सोबत आळंदी येथे नेण्यात येतात. सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुध्द 05 ते मार्गशिर्ष शुध्द पौर्णिमा या कालावधीत आळंदी येथे जाऊन परत येत असतो. प्रतिवर्षीप्रमाणे या सोहळ्याचे दि.05 नोव्हेंबर 2025 रोजी प्रस्थान झाले असल्याची माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
कार्तिक शुध्द 05 रोजी गोपाळपूर येथे गोपाळ काला होऊन सर्व संतांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या व कार्तिकी यात्रेची सांगता झाली. परंपरेनुसार श्रींच्या पालखींची नगर प्रदक्षिणा झाली. यावेळी श्रींच्या पालखीचे अबाल, वृध्द, अनाथ, दुर्बल, भाविकांनी दर्शन घेतले.
सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुध्द पोर्णिमा म्हणजे दि. 05 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरहून प्रस्थान करून कार्तिक वद्य अष्टमी दि 12 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे पोहचणार असून, त्यानंतर दुस-या दिवशी इंद्रायणी स्नान, पालखी प्रदक्षिणा, द्वादशी खिरापत व दि. 17 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानोबाराय संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे.
पालखी सोहळा प्रस्थानावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, सोहळा मार्गदर्शक तथा सदस्य सल्लागार परिषद ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.
सदरचा पालखी मार्गशिर्ष शु. नवमी दि 29 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला परत येत आहे. या पालखी सोहळ्याच्या पायी मार्गावर आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सोई सुविधा उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. याशिवाय पालखी सोहळा संपर्क प्रमुख पदी श्री मेघराज महाराज वळके पाटील नियुक्ती करून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच या पालखी सोहळ्यासोबत पौराहित्य करणारे कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित राहणार असल्याचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी यावेळी सांगीतले.