

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे चरणस्पर्श दर्शन घेतात. यामुळे मूर्तीची झीज होत आहे. ही झीज भरुन काढण्यासाठी पुरातत्व विभागाने मंदिर समितीला विठ्ठल व रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपण प्रक्रिया करावी, असा अहवाल दिला होता. त्यानुसार दि.22 ते 24 जून या कालावधीमध्ये रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात येणार होती. परंतू, यास वारकरी संघटनांनी पंढरपूर येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी होऊन न्यायाधीश सोनाली राऊल यांनी पुढील आदेश येईपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंदिर दि.23 व 24 जून रोजी बंद न ठेवता दर्शनासाठी नियमित खुले ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. त्या अपीलवरील सुनावणी आज दि. 23 जून रोजी होणार आहे. वरिष्ठ न्यायालयाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे.
या अगोदर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर चारवेळा रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या वेळीस रासायनिक लेपन प्रक्रिया न करता नैसर्गिक आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी वारकरी संघटनांनी केली होती; मात्र याकडे प्रशासन व मंदिर समितीने दुर्लक्ष करून विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया 22 ते 24 जून कालावधीमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विठ्ठलाचे दर्शन 23 व 24 जून रोजी बंद ठेवण्यात आले होते; मात्र विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया करण्यात यावी. या मागणीसाठी पंढरपूर येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयात वारकरी संघटनेच्या वतीने गणेश लंके व बाळासाहेब डिंगरे यांनी याचिका दाखल केली होती.
यावर वारकरी महासंघाच्या वतीने ॲड. धनंजय रानडे यांनी श्री विठ्ठल सर्वसामान्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे, अशा श्रद्धास्थानावर रासायनिक लेपन प्रक्रिया करणे हे चुकीचे आहे. मूर्तीमध्ये देवपण असते. जसं मनुष्याच्या शरीराला रासायनिक प्रक्रिया केली तर हानी पोहोचते. त्याचप्रमाणे देवाच्या मूर्तीलाही रासायनिक प्रक्रिया हानी पोहोचवते. त्याचप्रमाणे देवाला हानी पोहोचू नये तसेच याबाबत करवीर पिठाच्या शंकराचार्यानीही अशा रासायनिकलेपन प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे व सर्वोच्च न्यायालयाने उज्जैन प्रकरणी रासायनिक प्रक्रियेला स्थगिती दिली होती, असे उदाहरण त्यांनी न्यायालयासमोर ठेवले. दोन्ही बाजूने सुनावणीचा युक्तिवाद झाला. आज त्याचा निर्णय झाला असून न्यायाधीश राऊल यांनी पुढील आदेश येईपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, असे आदेश मंदिर समितीला देण्यात आले आहेत. रासायनिक लेपन प्रक्रियेमुळे भाविकांच्या श्रद्धेस तडा जातो असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला होता. याचा दाखला न्यायालयासमोर ठेवण्यात आला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी लेपन प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी या देवावर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. श्रद्धेला तडा जाऊ नये, मूर्तीमध्ये देवत्त्व असते, अशा देवतांवर रासायनिक प्रक्रिया करणे हे चुकीचे आहे. एखाद्या मनुष्याच्या शरीरावर रासायनिक प्रक्रिया केली तर त्याच्या जीवितास धोका होतो. त्याप्रमाणे मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केल्यास त्या मूर्तीलाही धोका पोहोचू शकतो. तसेच सर्वोच्च न्यायालयाचाही दाखला त्यांनी यावेळी दिला. न्यायालयाने तो ग्राह्य दाखला आणि या लेपन प्रक्रियेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली.
-ॲड. धनंजय रानडे, वारकरी महासंघाचे वकील
मंदिर समितीचे अपील वरिष्ठ न्यायालयात
न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून प्रस्तावित संवर्धनाची कार्यवाही सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. दरम्यान, मा. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाविरुद्ध संबंधित वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. त्या अपीलवरील सुनावणी दि. 23 जून रोजी होणार आहे. वरिष्ठ न्यायालयाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात येणार आहे.
-गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष मंदिर समिती पंढरपूर
दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू -
सद्यस्थितीत दिनांक 23 व 24 जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असून दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू राहील. याची वारकरी, भाविक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.