

पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये प्रस्तावित कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने सोमवार, दि. 2 मार्च रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. एकच जिद्द कॉरिडॉर रद्द, जुलमी कॉरिडॉर रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या.
महाद्वारातील नामदेव पायरी येथे संत श्री नामदेव महाराजांच्या पायरीचे वारकरी संप्रदायातील माऊली महाराज शिरवळकर, वडगावकर महाराज, देहूकर महाराज यांच्या हातून पूजन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आजपर्यंत बाधित भागातील नागरिकांनी कॉरिडॉर विरोधात अनेक चळवळी केल्या. सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला. यात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देण्यात आले.
पंढरपुरात मोठ्या सरकारी जागा बिगर उपयोगाच्या पडून आहेत. त्यावर शासनाने कॉरिडॉरसारखे प्रकल्प उभे करावे. बाधितांच्या ज्या घरांमध्ये वारकरी बांधवांच्या सगळ्या सोयी होतात. ती घरे अजिबात पडू नयेत. कॉरिडॉर सरकारी जागांवर करावा, अशा पद्धतीच्या मुख्य मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चात बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, नगरसेवक शिंदे -नाईक, किरण घाडगे, वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज, वट्टमवार ताई, डॉ. प्राजक्ता बेणारे, बिडकर आदींची भाषणे झाली. आ. अभिजित पाटील हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी आपले विचार मांडले. या मोर्चात नानासाहेब कवठेकर, नगरसेवक ओंकार जोशी, रा. पां. कटेकर, गणेश लंके, वैभव बडवे, अनिल गवळी, प्रशांत खंडागळे, यशवंत बेणारे, उंडाळे वकील आदी सहभागी झाले होते.