

पंढरपूर : आषाढी यात्रेला अवघे पंधरा दिवस उरले असताना आणि प्रशासकीय यंत्रणा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज होत आहे. दरम्यान पंढरपुरात आज (दि.२०) अत्यंत दुःखद घटना घडली आहे.
शुक्रवारी (दि.२०) सकाळी ७ वाजेच्या सुमारास चंद्रभागा नदीत स्नान करताना बुडून बेळगाव येथील शुभम पावले (वय २७) या तरुण भाविकाचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम वाहून गेल्याचे समजत आहे. ही घटना पुंडलिक मंदिराजवळ घडल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आपल्या मित्रांसोबत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आला होता. शुक्रवारी सकाळी तो मित्रांसह चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी गेला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शुभमचा मृतदेह शोधण्यात यश आले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच महापुराचे सावटही यात्रेवर घोंगावत आहे. आजच्या या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने नदीकिनारी, विशेषतः स्नानाच्या ठिकाणी, तातडीने जीवरक्षक यंत्रणा सज्ज करावी आणि सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक कराव्यात, अशी मागणी भाविकांमधून जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे पंढरपूर आणि बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आषाढीसारख्या पवित्र सोहळ्याच्या तोंडावर अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.