

पंढरपूर : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत वकिलांवर प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. काही घटनांमध्ये वकील दाम्पत्याचा खून झालेला असून अनेक वकिलांना गंभीर इजा झाली आहे. तरीही गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र शासन अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यास टाळाटाळ करत आहे. याच निष्क्रियतेविरोधात पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्यांनी आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण करणार्यांमध्ये अॅड.प्रतापसिंह शेळके, अॅड. शक्तीमान माने आणि इतर वकील सहभागी झाले आहेत.
दरम्यान, वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून अॅड.दत्तात्रय पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची घटना गंभीर आहे. यातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, राज्य शासनाने अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट’ पावसाळी अधिवेशनातच मंज़ूर करावा, आदी मागण्यांसाठी येथील ज़िल्हा सत्र न्यायालयातील सर्व वकिलांनी मंगळवारी (दि.8) दिवसभर काम बंद आंदोलन केले. तर न्याय मिळेपर्यंत हे आमराण आंदोलन सुरु ठेवले आहे.
वकिलांवर वारंवार होणार्या हल्ल्यांमुळे संपूर्ण न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे. या कायद्याच्या अभावामुळे वकिलांचे जीवन असुरक्षित झाले असून, सरकार व प्रशासन केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेत आहे. पंढरपूर अधिवक्ता संघाने इशारा दिला आहे की, जर यावर तातडीने पावले उचलली गेली नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप धारण करेल. वकील सुरक्षित तरच न्याय सुरक्षित! असा नारा दिला आहे.