

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉर प्रस्तावित आहे. काशी विश्वनाथ तसेच तिरुपतीच्या धर्तीवर पंढरीत कॉरिडॉर राबवण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रा पार पडताच कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही यात्रा परंपरेनुसार भरत आलेल्या जुन्या पंढरपुरातील शेवटची कार्तिकी यात्रा ठरणार आहे.
कॉरिडॉर राबवित असताना पंढरपूरचे जुने पुरातन रुप पालटणार असले तरी ऐतिहासिक वास्तु, वाडे जतन करण्यात येणार आहेत. जुन्या पंढरपूरचे चित्र आता दृष्टिआड जाणार असून नवीन पंढरपूरचे रुप कॉरिडॉरनंतर भाविकांना अनुभवयास मिळणार आहे.
विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, वाळवंट येथे यात्रेत अरुंद रस्त्यांमुळे चेंगराचेंगरी होत असे. कॉरिडॉर झाल्यानंतर असे प्रकार घडणार नाहीत. कॉरिडॉरमध्ये मंदिर, मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, नदीपात्राची घाटबांधणी, चंद्रभागेत कायमस्वरुपी स्नानाची व्यवस्था, पालखी मार्ग याठिकाणी भाविकांना दर्जेदार सेवासुविधा उपलब्ध होणार आहेत. कॉरिडॉरमुळे जे नागरिक बाधित होणार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. ज्या नागरिकांची घरे जाणार आहेत, त्यांना सर्वोच्च मोबदला तसेच ज्यांची दुकाने दिली जात आहेत, त्यांना दुकानाला पर्यायी दुकान किंवा शासकीय मोबदला दिला जाणार आहे. त्याचे पॅकेजही जाहीर करण्यात आले आहे.
कॉरिडॉरमध्ये शहरात बारा ठिकाणी बहुमजली पार्किंगची सुविधा पुरविली जाणार आहे. शहराकडे येणारे सर्व रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचा देखील नगरपरिषदेतर्फे विकास केला जाणार आहे. कॉरिडॉर झाल्यानंतर यात्रेच्या वेळीच गर्दी होणार नाही, तर बाराही महिने पंढरीत वारकरी पर्यटकांची गर्दी राहणार आहे. पंढरपुरात आल्यावर वारकरी भाविकांचे इथले वास्तव्य सुखकर होईल, असा केंद्र आणि राज्य शासनाला विश्वास आहे. साहजिकच इथल्या बाजारपेठा गजबजल्या तर पंढरपुरातील नागरिकांनादेखील याचा फायदा होऊन पंढरपूर आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे.