Pandharpur Kartiki Yatra : कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्‍च प्राधान्य

अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे; ४ हजार ६५६ कर्मचाऱ्यांसह पोलिस प्रशासन सज्‍ज
Pandharpur Kartiki Yatra
Pandharpur Kartiki YatraPudhari
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी लाखो वारकरी व भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने व्यापक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी एकूण ४ हजार ६५६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने शहरातील प्रमुख चौकांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, भाविकांची गैरसोय टाळणे, चोरीसारख्या घटनांना प्रतिबंध करणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

यात्रेच्या कालावधीत नदीपात्र, ६५ एकर, महाद्वार परिसर, महाद्वार घाट, पत्राशेड यांसह गर्दीच्या प्रमुख ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत. चोरी, पाकीटमारी रोखण्यासाठी 'माऊली स्कॉड' पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी सुमारे ३३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे.

सात ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट आणि अंबाबाई पटांगण यांसह प्रमुख ठिकाणी ही मदत केंद्रे कार्यरत राहणार आहेत. जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १३ ठिकाणी डायव्हर्जन पॉईंट सुरू करण्यात आले आहेत. तसेच खासगी वाहनधारकांसाठी शहरात व शहराबाहेर मिळून १३ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांनी सूचनांचे पालन करावे

वारकरी व भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच पोलिस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले आहे.

असा आहे बंदोबस्त

एक पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक, १८ पोलिस उपअधीक्षक, ४६ पोलिस निरीक्षक, २७८ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, २ हजार ५९२ पोलिस अंमलदार, १०० गामा पथकाचे जवान, १६२० होमगार्ड, ३ एसआरपीएफ टीम, २ बॉम्ब शोधक व नाशक पथके, दोन शीघ्र कृती पथके व क्यूआरटी पथक, ९ प्रशिक्षित कार्ट पथके आदी तैनात करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.