

पंढरपूर : कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा शनिवार, दि. २१ रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी प्रशासनाने केलेल्या नियोजन व सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पंढरपूर येथील ६५ एकर (भक्ती सागर), चंद्रभागा वाळवंट, चंद्रभागा नदीपात्र परिसराला भेट दिली. आरोग्य शिबिराला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. आपत्कालीन मदत केंद्रातील सुविधांची माहिती घेतली. भक्ती सागर परिसरातील नदी घाटावर जाऊन त्यांनी घाटाच्या स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी स्वतः पाण्याचा फवारा मारून स्वच्छता केली. वारकरी भाविकांशी संवाद साधत त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती घेतली. परिसरातील भजनी मंडळांच्या सहभागाने विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
वारकरी व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत उपलब्धता करण्यात आली आहे, त्याचे उद्घाटन त्यांनी केले. तसेच भक्ती सागर (६५ एकर) येथे चक्कर येऊन पडलेल्या भाविकांना तत्काळ या रुग्णालयात उपचार देण्यात आले. यावेळी त्यांनी भाविकाच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली. भाविकांशी संवाद साधला व प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांविषयी त्यांची मते जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आ. राजू खरे, आ. अभिजित पाटील, नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, अनिल सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आशिष लोकरे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
मृत कामगारांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट
आंबे येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तनपुरे मठ येथे भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत २१ नोव्हेंबर रोजी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबातील मुलाला नोकरी मिळवून देण्याची आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घेतली.