

पंढरपूर : कार्तिकी शुद्ध एकादशी दि. २१ नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. १० लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांच्या सेवेकरीता दर्शन रांगेत १५ पत्राशेड उभारण्यात आले आहेत. वारकरी-भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कार्तिकी शुद्ध एकादशीच्या दिवशी पहाटे २.२० वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेत बॅरिकेडिंग, ताडपत्री शेड, अतिरिक्त पत्राशेड, आपत्कालीन प्रवेशद्वारे, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची व्यवस्था, थेट दर्शन सुविधा, कुलर, पंखे व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगेचे नियोजन करण्यात आले आहे.
दर्शन मंडप ते कासार घाटापर्यंत स्कायवॉक, तसेच स्कायवॉक ते रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपापर्यंत बॅरिकेडिंग व ताडपत्री शेड उभारण्यात येत आहे. रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप परिसरात कायमस्वरूपी दर्शन हॉलचे बांधकाम सुरू असल्यामुळे गोपाळपूर-स्वेरी कॉलेज रोडवरील खासगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात पत्राशेड उभारण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण १५ पत्राशेड उभारण्यात आले आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ते स्वेरी कॉलेज, गोपाळपूरपर्यंत सुमारे ४ किलोमीटर लांबीची दर्शनरांग राहणार आहे. तर मुखदर्शनासाठी श्री संत तुकाराम भवन ते छत्रपती संभाजी चौकपर्यंत बॅरिकेडिंग व ताडपत्री शेड उभारण्यात आले आहेत. भाविकांसाठी अपघात विमा योजना राबविण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था
भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, बॅग स्कॅनर मशीन, मॅन काउंटिंग मशीन, सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, जनरेटर, ४० वॉकी-टॉकी संच, सार्वजनिक सूचना प्रणाली व चौकशी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आपत्कालीन विशेष यंत्रणा
श्री संत तुकाराम भवन येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष (ईओसी) उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही यंत्रणा, थेट दर्शन, सार्वजनिक सूचना प्रणाली, अग्निशमन वाहन व वॉकी-टॉकी यंत्रणेच्या माध्यमातून यात्रा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
नदीपात्रात १२० जीवरक्षक
चंद्रभागा नदीपात्रात स्थानिक पोहणारे (जीवरक्षक) व मंदिर समितीचे कर्मचारी मिळून सुमारे १२० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १५ चेंजिंग रूम व ६ हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहे.