Pandharpur Vitthal Temple: विठ्ठलचरणी अर्धा किलो सोन्याच्या पादुका अर्पण

भाविकाने नाव ठेवले गुप्त; किंमत ५६ लाख रुपये
Pandharpur Vitthal Rukmini Temple
Pandharpur Vitthal Rukmini TemplePudhari
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी एका दानशूर भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर पंढरीच्या श्री विठ्ठलचरणी सोन्याच्या पादुका दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या पादुकांचे वजन ४४६ ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत ५६ लाख ५९ हजार रुपये इतकी आहे. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होत आहेत. त्यांच्याकडून मंदिर समितीकडे रोख देणगीबरोबरच सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात दान प्राप्त होत आहे.

अहिल्यानगर येथील भाविकाने या सोन्याच्या पादुका दान स्वरुपात दिल्या आहेत. दिवसेंदिवस विठ्ठलाच्या खजिन्यात विविध सोन्याच्या दागिन्यांची भर पडत आहे. या अगोदर चांदीच्या पादुका घातल्या जात होत्या. मंदिरात सोने, चांदीच्या वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कक्षामध्ये दान स्वरूपात प्राप्त होणाऱ्या मौल्यवान वस्तूंची तपासणी, शुद्धता, पडताळणी, वजन, नोंदणी व सुरक्षित स्वीकार करण्यासाठी दोन सराफ तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दान देणाऱ्या भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधून अधिकृत पावतीसह दान करावे, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले आहे.

यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच लेखाधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.

एका दानशूर भाविकांने नाव न सांगता या सोन्याच्या पादुका विठ्ठलचरणी दान केल्या आहेत. त्यामुळे विठ्ठलाचे चरण सुवर्णमय झाले आहेत. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवळीही या सोन्याच्या पादुका विठ्ठलाला घातल्या जाणार आहेत.
-गहिनीनाथ महाराज औसेकर सहअध्यक्ष मंदिर समिती, पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news