

पंढरपूर : पंढरपूर शहरातील टाकळी रोडवरील गजानन नगर येथे सज्जन कलाप्पा माने यांचे सलुनचे दुकान आहे. त्यांनी शहरातील चार खासगी सावकारांकडून व्याजाने पैसै घेतले होते. रक्कम व व्याज परत करूनदेखील सावकारांनी दमदाटी करत मोटारसायकल व मोबाईल घेऊन गेले. या खासगी सावकारांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये योगेश रमेश शिंदे रा. एल.आय.सी. ऑफिस पाठीमागे पंढरपूर, अजित रामचंद्र हजारे रा. टाकळी रोड पंढरपूर, अमोल बाबासाहेब गांजाळे रा. गोविंदपुरा पंढरपूर, सोन्या पवार रा. गाडगेबाबा चौकजवळ पंढरपूर अशी खासगी सावकारांची नावे आहेत.
सज्जन कलाप्पा माने रा. चळे (ता. पंढरपूर) यांचे टाकळी रोडवरील गजानन नगर एस.के. हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने रक्कम घेतली होती. सदरची रक्कम व व्याज परत करूनदेखील सावकारांनी माने यांना व्याजाने दिलेल्या पैशासाठी तगादा लावला. तसेच फिर्यादीचे मालकीची मोटारसायकल व मोबाईल हँडसेट बळजबरीने घेऊन गेले आहेत. असा तक्रारी अर्ज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे दाखल केला होता.
या तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथक, पंढरपूर पोलिस ठाणे पथक व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील अधिकारी यांनी संयुक्तपणे शहरातील खासगी सावकार योगेश रमेश शिंदे, अजित रामचंद्र हजारे, अमोल बाबासाहेब गांजाळे, सोन्या पवार यांच्या घरी जाऊन छापा टाकला. पंचनामे करून सावकारकीबाबतचे कोरे चेक, करारनामे, खरेदीखत व कोरे स्टॅम्प हस्तगत केले.
बेकायदा सावकारकी कायद्यांतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. गोविंद कामतकर, शिवशंकर हुलजंती, राहुल लोंढे, सपोनि आशिष कांबळे, पोलिस उपनिरीक्षक नितीन जगताप, शहाजी मंडले, प्रसाद औटी, दीपक नवले यांनी केली आहे. दरम्यान, पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध सावकारांचे मोठे जाळे आहे. यात सर्वसामान्य नागरिक अडकत आहेत.
खासगी सावकार 20 ते 30 टक्क्यांनी पैसे वसूल करत आहेत. सावकारकीतून शेतकर्यांच्या जमिनी, घरे, वाहने बळकावली जात आहेत. सावकारांकडून दमदाटी करण्यात येत असल्याने अनेक शेतकरी, नागरिक खासगी सावकारांविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.