

पंढरपूर : भीमा नदीच्या पुरामुळे उसाबरोबर केळी व इतर पिकांना मोठा फटका बसला. परिणामी, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता पूर ओसरला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पंढरपूर येथे 1 लाख 90 हजार क्युसेकचा विसर्ग आल्यामुळे भीमा नदीपात्राच्या बाहेर किमान दहा ते पंधरा फूट पाणी होते. नदीपात्रापासून पाच कि.मी.पर्यंत पाणी शेतात शिरले होते. देगाव व अजनसोंड येथील ओढ्याद्वारे पाच कि.मी.पर्यंत पाणी शेतात शिरले आहे. या पाण्याने शेती पिकांची नासाडी झाली आहे. जनावरांच्या चार्याच्या गंजी, ढेपणी वाहून गेल्या. तर नदीकाठच्या गावातील अनेक घरांत पाणी शिरल्याने मोठी पडझड झाली. शेतातील बांध वाहून गेले. नदीकाठच्या शेताची माती वाहून गेली. त्यामुळे ऊस व केळी पिकासह शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.
169 घरांचा पंचनामा करावा लागणार
पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण परिसर, व्यासनारायण झोपडपट्टी तसेच संत पेठ येथील मिळून 134 घरांत पाणी शिरले. तर 543 लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. या नागरिकांच्या घरांचे तसेच ग्रामीण भागातील 35 घरांमध्ये पाणी शिरले होते. तर 171 लोकांना स्थलांतरित करावे लागले होते. अशा एकूण 169 घरांचा पंचनामा करावा लागणार आहे.