

पंढरपूर :
जातो माघारी पंढरीनाथा ।
तुझे दर्शन झाले आता ॥
आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा करून मनोमन विठ्ठल- रुक्मिणीचे नमन करत भाविकांनी द्वादशीला म्हणजे रविवारी परतीचा प्रवास सुरू केला. भाविक परत निघाले असले तरी मानाच्या पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत मुक्कामी असणार आहेत. गोपाळपूर येथील गोपाळकाला पूर्ण केल्यानंतरच पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
आषाढीकरिता पंढरपूर येथे वास्तव्यास असलेले भाविक एकादशी साजरी करून परतत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने यात्रा काळात चंद्रभागा बसस्थानकासह चार ठिकाणी तात्पुरती बसस्थानके कार्यान्वित केली आहेत.
तर, खासगी वाहनांसाठी शहर व परिसरात १८ ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. भाविकांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासाला वाहने बाहेर पडत असताना रस्त्यावर गर्दी होत असून, वाहतूक कोंडीचादेखील सामना करावा लागत आहे. एकादशी साजरी करून द्वादशीला परतीच्या प्रवासासाठी भाविक रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर गर्दी करत आहेत.