

पंढरपूर : ‘गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने गोड केला...’ या जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या गजरात, हजारो भाविकांच्या साक्षीने पंढरपुरात महाद्वार काल्याचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्यानेच आषाढी वारीची खर्या अर्थाने सांगता होते, अशी वारकर्यांची द़ृढ श्रद्धा आहे.
पंढरपुरातील हरिदास घराण्याकडे हा महाद्वार काला आयोजित करण्याची सुमारे चारशे वर्षांपासूनची परंपरा आहे. तब्बल अकरा पिढ्यांपासून हा भक्तिपूर्ण सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. परंपरेनुसार, हरिदास यांच्या काल्याच्या वाड्यात मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर शंभर फूट लांब पागोट्याने श्री विठ्ठलाच्या पादुका बांधण्यात आल्या. यानंतर हा सोहळा श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात पोहोचला. येथे मदन महाराजांना खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या आणि अनिल महाराज हरिदास यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
तेथून हा काल्याचा लवाजमा महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात दाखल झाला. वाळवंटात श्री विठ्ठलाच्या पादुकांना चंद्रभागेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. कुंभार घाट, खासगीवाले धर्मशाळा, मुक्ताबाई मंदिर चौक, आराध्ये गल्ली आणि हरिदास वेसमार्गे काल्याची ही मिरवणूक पुन्हा वाड्यात परतली. या संपूर्ण मार्गावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. स्थानिक दुकानदार आणि वारकर्यांकडून रस्त्यावर गुलाल, बुक्का आणि लाह्यांची मुक्त हस्ताने उधळण केली जात होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते.
सोहळा पुन्हा वाड्यात दाखल झाल्यानंतर दहा पोती लाह्यांपासून तयार केलेला काला भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला. या प्रसादाचे सेवन करूनच वारकरी आपल्या गावाकडे परतीचा प्रवास सुरू करतात, त्यामुळे या काल्याला वारीच्या सांगतेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हरिदास घराण्यातील संत श्री पांडुरंग महाराज हरिदास यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने आपल्या पादुका प्रसाद रूपाने हरिदास यांना दिल्या. त्या पादुकांची संत हरिदास यांनी डोक्यावरून मिरवणूक काढली. तेव्हापासून चारशे वर्षांनंतर आताही हरिदासांच्या महाद्वार काल्याची ही परंपरा कायम आहे. संत नामदेव महाराजांच्या वंशजांना यामध्ये मान असतो. श्री नामदास महाराजांची दिंडी आल्यावरच काल्याचा उत्सव सुरू होतो.