

माळशिरस : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असून या सोहळ्यातील नातेपुते ते शिंगणापूर पाटी दरम्यान २० पुरुष व २१ महिला खिसे कापू व मोबाईल चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे की, दिंडीतील वाहने व इतर वाहन चालकांनी वाहने वाहतुकीस अडथळा होईल, अशी लावू नयेत. यावेळी एलसीबीचे पोलिस निरीक्षक जी. बी. जगताप, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे हे उपस्थित होते.
यावर्षी प्रथमच ५ जी मोबाईलचा वापर केला असून यामुळे अनेक अधिकारी ग्रुपला जोडले असल्याने सर्व माहिती तत्काळ मिळणे सुलभ झाले आहे. तसेच रिंगण ठिकाणी व मुक्काम ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस मदत केंद्र व वॉच टॉवर उभा करण्यात आले आहेत. पालखी कुठे आली, हे पाहण्यासाठी नागरिकांनी sp.solapur.gov.in या संकेत स्थळावरून माहिती घ्यावी. यावर्षी वारीमध्ये वाहनांची संख्या जास्त असून अनेक वाहने रस्त्यावर उभा केल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. वाहतुकीचा अडथळा होऊ नये, यासाठी वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे. नागरिकांनी चोरापासून सावध राहावे, असे आवाहन केले आहे.